चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरातील जनता लांचर येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. होस्टेलच्या वॉर्डन व इतर कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार मुलाने वडिलांना केली होती, अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा (पिपरी) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जनता लांचर, रामनगर येथे राहात असताना गळफास देवून आत्महत्या केल्याची गंभीर घटना आज (२० नोव्हेंबर २०२५) सकाळी ७.३० ते ९.०० च्या दरम्यान घडली. सकाळी घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली.
मयत मुलाचे वडील गुलाब विठुजी सुदरी (वय ४४) रा. धानोरा पिपरी) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यात त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा होस्टेलमध्ये राहात असताना वॉर्ड बॉय आणि व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती त्याने काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्याची मनःस्थिती अस्थिर दिसत असूनही कुटुंबीयांनी त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असेही फिर्यादीने नमूद केले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार रामनगर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आरोपीं लक्ष्मन रमाजी चौधरी (वॉर्डन), प्रेमा झोटींग (व्यवस्थापक),विष्णुदास शरद ठाकरे (सल्लागार), आशिष कृष्णाजी महातळे (प्राचार्य) यांच्या विरुद्ध कलम 107, 3(5) भान्यास अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून होस्टेल व्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.