2 हजाराच्या मुद्रांक पेपर खरेदीसाठी अतिरिक्त 140 रुपयांची मागणी 
चंद्रपूर

Chandrapur News | 2 हजाराच्या मुद्रांक पेपर खरेदीसाठी अतिरिक्त 140 रुपयांची मागणी

मुद्रांक विक्रेत्यासह मदतनिस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शासकीय नियमांपेक्षा अधिक रक्कम आकारून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात अँटी करप्शन ब्युरोने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. चंद्रपूर शहरातील जलनगर वॉर्ड येथील मुद्रांक पेपर विक्रेता मनिष अरुण देशमुख यांनी २००० मूल्याच्या मुद्रांक पेपर्सवर १४० अतिरिक्त लाच मागितल्याने त्यांना आणि त्यांच्या मदतनीस रूपाली भरतलाल चौधरी हिला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, चंद्रपूर यांनी काल शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रोजी केली.

तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांना विजेच्या टेंडरशी संबंधित कामासाठी ५०० रुपयांचे तीन व १०० रुपयांचे पाच असे एकूण ₹२००० मूल्याचे मुद्रांक (स्टॅम्प) पेपर्स खरेदी करायचे होते. मात्र विक्रेता मनिष अरुण देशमुख यांनी शासनाने ठरविलेल्या दरांपेक्षा अतिरिक्त १४० लाच म्हणून देण्याची मागणी केली.

तक्रारदाराला ही मागणी अनुचित वाटल्याने त्यांनी दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला.

३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सापळा कारवाईदरम्यान, आरोपी मनिष अरुण देशमुख यांनी तक्रारदाराकडून एकूण ₹२१४० (₹२००० शासकीय शुल्क व ₹१४० लाच) रक्कम स्वीकारून ती त्यांच्या मदतनीस रूपाली भरतलाल चौधरी हिच्याकडे दिली. त्याच क्षणी अँटी करप्शन पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. प्राथमिक चौकशीत देशमुख यांनी शासनाने दिलेल्या परवान्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांकडून लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ही  कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर; श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर; आणि श्रीमती मंजुषा भोसले, उपअधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, म.पो.शि. पुष्पा काचोळे आणि चापोशि सतिश सिडाम यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT