Sonapur Sarangad Road Bike Accident
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील सोनापूर लगतच्या सात बहिणी पर्यटनस्थळावर आज शनिवारी पर्यटकांची मोठी गर्दी असतानाच परतीच्या मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडकली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला असून, अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. धडक इतकी जोरदार होती की विद्युत खांबाचे तीन तुकडे झाले.
सोनापूर गावालगत असलेल्या सातबहिणी पर्यटनस्थळावर दर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. आज शनिवारीही वर्धा जिल्ह्यातील वाशीकोरा येथील तिघे तरुण दुचाकीने पर्यटनासाठी येथे आले होते. पर्यटन आटोपल्यानंतर सायंकाळी ते परतीच्या मार्गावर असताना सोनापूर-सारंगड मार्गावर दुचाकीवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या डोक्याला, हात-पायांसह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली. दुचाकी चालक आणि मागे बसलेला अन्य एक तरुण किरकोळ जखमी झाले. याच मार्गाने स्वतःचे गावी ड्युटी आटोपून परत येत असताना वैद्यकीय अधिकारी सुषमा फटिंग यांना सदर अपघात लक्षात आला. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गंभीर जखमीसह तिघांना पुढील उपचारासाठी तातडीने ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले. गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दुचाकीची विद्युत खांबाला झालेली धडक एवढी भीषण होती की खांब पूर्णतः तुटून त्याचे तीन तुकडे झाले. त्यामुळे गोविंदपूर-सोनापूर सारंगगड परिसरातील विद्युत पुरवठाही बराच वेळ खंडित राहिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
वाहनांच्या वेगावर नियंत्रणाची मागणी
गोविंदपूरपासून सोनापूरमार्गे सातबहिणी पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोविंदपूर, सोनापू र परिसरातील नागरिकांनी केली आहे.