चंद्रपूर : सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहाळी गावात मध्यरात्री झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. राजू आनंदराव सिडाम (वय ३५, रा. मोहाळी) याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सिडाम हा घरी एकटा असताना अज्ञात इसम मध्यरात्री त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने गळा कापून त्याचा खून केला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
मृत राजू याची पत्नी पुनम (वय ३०), मुलगा मेहरदीप (वय ८) व मुलगी वैष्णवी (वय ६) हे वरोरा येथे वास्तव्यास आहेत. पुनम ही पेट्रोल पंपावर काम करत असून त्यांच्या मुलांचे शिक्षणही वरोरा येथे सुरू आहे. राजू याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो काही दिवसांपूर्वी गावी परतला व अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. घटनास्थळी शिजलेले अन्न, तसेच किचनपासून बेडरूमपर्यंत रक्ताचे डाग सापडले. बेडरूममध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासासाठी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान आरोपी ज्या दिशेने पळाले त्या दिशेला फिरून आला. रात्री घरात आलेल्या लोकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.