धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावलेली जाळी. दुसऱ्या छायाचित्रात बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले.  Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : सिन्देवाही तालुक्यातील धुमनखेडा गावात बिबट्याचा धुमाकूळ

leopard Attack | एका वनरक्षकासह पाच व्यक्ती जखमी, सहा तासाचा रेस्क्यू करून बिबट्या जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गावाशेजारील जंगलातून एका बिबट्याने सिन्देवाही तालुक्यातील धुमनखेडा गावात प्रवेश केला. गावात धुमाकूळ घालून काही व्यक्तींना किरकोळ जखमी केले. त्यानंतर कुसनदास मेश्राम यांच्या घरी बस्‍तान मांडले. दुपारी अडीच वाजलेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल सहा तास रेस्क्यू करून वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले. दिवसभर दहशत असलेल्या धूमनखेडा वासियांनी रात्री साडेआठ नंतर सुटकेचा विश्वास घेतला. या घटनेमध्ये वनरक्षक सहारे यांच्यासह पाच जण किरकोळ जखमी झाले.

  सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या धुमनखेडा गावात आज शनिवारी बिबट्याने गावशेजारील शेतशिवारातून दुपारच्या सुमारास गावात प्रवेश केला. 

  गावालगत असलेल्या शेतात   दुपारच्या सुमारास  जयश्री रवि शेन्डे हि महिला लाख खोदत होती. यावेळी बिबट्याने महिलेवर हल्ला करून जखमी केले. नशीब बलवत्तर म्हणून महिलेचा जीव वाचला. तिथून थेट गावात प्रवेश करून कुसनदास मेश्राम यांच्या गोठ्यात बस्तान मांडले. त्या नंतर लगतच्या देवानंद बन्सोड यांच्या घरी प्रवेश करून  पत्नी सुषमा व त्यांनाही जखमी केले. त्यांचे घराशेजारी उभा असलेला  चंद्रभान पांडूरंग बन्सोड याचेवर हल्ला केला. तोही किरकोळ जखमी झाला. परत कुसनदास मेश्राम ला यांच्या गोठ्यात बस्तान मांडले.

लगेच सदर घटनेची माहिती वन विभाग व पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. लगेच वन व पोलीस विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता पासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू सुरू करण्यात आला.  मेश्राम यांच्या गोठ्यामध्ये दडी मारून असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण गोठ्याला जाळीने बंदिस्त करण्यात आले. दुपारपासून बिबट्या गोठ्यात घुसून असल्याने रेस्क्यू दरम्यान नागरिकांनी अवतीभवती प्रचंड गर्दी केली. वन विभाग आणि व पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा रेस्क्यू सुरु केला. बंदिस्त असलेल्या गोठ्यातून बिबट्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला परंतु जाळी लावल्याने त्याला पडता आले नाही याच दरम्यान वनरक्षक जितेंद्र सहारे यांच्यावर जाळीतूनच हल्ला करून जखमी केले.

     गावात नागरिकांना धोका होवू नये म्हणून पोलीस विभागाने सुरेक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता त्यासाठी पोलीस निरीक्षक,, विजय राठोड घटना स्थळी हजर होते .यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात वनविभाच्या चम्मुने तब्बल सहा तासानंतर रात्री साडेआठ वाजता बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. तब्बल सहा तासानंतर धूमन खेडा गावातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT