चंद्रपूर : तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा पोलिस स्टेशन समोर लावून असतानाच एक मृत अर्भक आढळून आल्याने एकाच खळबळ आढळून आली आहे. ही घटना काल शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चिमूर पोलिस ठाण्या समोर उघडकीस आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात काल शनिवारी रात्री नऊ महिन्याचे मृत अर्भक आढळून आले. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत चिमुर पोलिस स्टेशन लागून आहे. काल रात्री काही लोकांना रस्त्यालगत एक अर्भक असल्याचे लक्षात आले. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता. अर्भक असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेच त्या अर्भकाला ताब्यात घेतले. अर्भकाचा पाय, छाती खालील भाग भटक्या प्राण्यांनी खाल्ला आहे. तोंड व पाय कायम असल्याचे दिसून आले. सदर अर्भक ९ महिन्याचे असल्याची माहिती आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांनी अर्भकाला खाल्ले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सर्व दृश्य टिपले गेल्याचे बोलले जात आहे. मात्र काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन समोरील सीसीटीव्ही कॅमेरा अनेक महिन्यांपासून बंद आहे. कॅमेरा बंद असेल तर पोलिसांना अर्भकाला पोलीस स्टेशन समोरील परिसरात टाकणाऱ्या त्या कुमारी मातेचा शोध अवघड ठरेल. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहे.