चंद्रपूर : मागील दोन दिवसापासून चंद्रपूरला मागे टाकीत अकोल्याचे तापमान राज्यात हॉट ठरले होते. काल शनिवारी पुन्हा तापमानात वाढ होऊन अकोल्यालामागे टाकीत नागपूर हॉट ठरले. आज रविवारी मात्र नागपूरच्या तापमानात 0.7 अंशाने घट झाली तर चंद्रपूरच्या तापमानात 0.6 अंशाने वाढ झाली होऊन 44.6 अंशाची नोंद करण्यात आली. आज चंद्रपूरचे राज्यातील उच्चांकी तापमान आहे. अमरावती, ब्रम्हपुरी, वर्धा, अकोला, नागपूर येथे 44 अंश तापमानाची नोंद झाली.
दरवर्षी मे जून महिन्यात प्रचंड कडक उन्हाळा जाणवत होता. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकत आहे. राज्यात विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे आणि दरवर्षी राज्यात देशात चंद्रपूरचे तापमान सर्वात हॉट असते. परंतु यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भातील अन्य जिल्ह्यांनी चंद्रपूरला मागे टाकले आहे. अकोला मागील काही दिवसांपासून तापमानात राज्यात सर्वात पुढे आहे. काल शनिवारी विदर्भात सुर्याने आग ओकली. त्यामुळे अकोल्याला मागे टाकीत नागपूरने उच्चांक गाठला. त्यासोबतच राज्यात नागपूर, अकोला, चंद्रपूर व वर्धेचे तापमान 44 अंशाच्या पार गेले होते.आज रविवारी नागपूरच्या तापमानात 0.7 अंशाने घट झाली. तर चंद्रपूरचे तापमान 0.6 अंशाने वाढले आहे. येथे 44.6 अंशाची नोंद घेण्यात आली.
आज विदर्भातील चंद्रपूर 44.6, अमरावती 44.4, ब्रम्हपुरी 44.4,अकोला 44.3, नागपूर 44.0,वर्धा 44.0, यवतमाळ 43.6, गडचिरोली 42.6,वाशिम 42.6, गोंदिया 42.2, भंडारा 41.4, बुलढाणा मध्ये 39.6 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.