Chakpiranji Gram Panchayat Sanitation Issues
चंद्रपूर : मृत कुत्रा तब्बल २४ तासांहून अधिक काळ रस्त्यावर पडून राहिल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर मृत कुत्रा थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून दरवाज्यावर टांगत निषेध व्यक्त केला. सावली पंचायत समिती अंतर्गत चकपीरंजी ग्रामपंचायतीतील या प्रकारामुळे प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट) चकपीरंजी–गडचिरोली मुख्य मार्गावर किशोर लाडे यांच्या घरासमोर एक कुत्रा मृतावस्थेत आढळून आला. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या शिपायांना माहिती दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, माहिती देऊनही मृत कुत्रा जागेवरून हटविण्यात आला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दुसऱ्या दिवशीही मृत कुत्रा त्याच ठिकाणी पडून राहिल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरली. कुत्र्याचे शरीर कुजण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना नाक मुठीत धरून रस्त्यावरून जाण्याची वेळ आली. वारंवार सूचना करूनही कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला. त्यांनी मृत कुत्रा उचलून थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणला आणि कार्यालयाच्या दरवाज्यावर टांगून प्रशासनाचा निषेध केला.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, गावातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि इतर कामांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. मात्र, या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील विहिरींमध्ये नियमितपणे ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीच्या कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित दोन्ही शिपायांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेतून हटवून त्यांच्या जागी कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मृत कुत्रा २४ तासांहून अधिक काळ मुख्य रस्त्यावर पडून राहिल्यानंतर ग्रामस्थांना तो स्वतः उचलून ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाज्यावर टांगण्याची वेळ येणे, हा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.