Chandrapur Sawali Fake Tobacco Raid Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Police Raid | सावलीत बनावट तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस व अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Sawali Fake Tobacco Raid

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या निर्मिती करून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली. सावली तालुक्यातील रयतवारी येथे टाकलेल्या छाप्यात बनावट (डुप्लिकेट) तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा, पॅकिंग साहित्य आणि वाहनासह एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सावली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तंबाखू व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपी मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे उत्पादन करून त्याची बाजारात विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, मौजा रयतवारी येथे विजय भिमाजी भांडेकर (वय ३३) रा. सामदा बु., ता. सावली) हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करत होता. तसेच त्याचे पॅकिंग करून बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची पडताळणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान तेथे मोठ्या प्रमाणावर तंबाखू उत्पादन व पॅकिंगचे साहित्य आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून

होला  आणि ईगल ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू,खुला सुगंधित तंबाखू,तंबाखू पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, आणि एम एच-34-सीजे -9625क्रमांकाचे वाहन असा

अंदाजे ११ लाख ३१ हजार ४०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपी विजय भांडेकर याची चौकशी केल्यानंतर त्याने जप्त करण्यात आलेला कच्चा माल व साहित्य विनय गुप्ता (रा. गोकुळ नगर, गडचिरोली) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. या कबुलीमुळे या अवैध व्यवसायामागील पुरवठा साखळीचा तपासही सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे प्रमाण लक्षात घेता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू होता. बनावट तंबाखू तयार करून त्याची विक्री विविध भागांत होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री ही मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी बाब मानली जाते. शासनाने अशा उत्पादनांवर बंदी घातलेली असतानाही आरोपींकडून त्याचे उत्पादन सुरू असल्याचे तपासात आढळून आले.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT