चंद्रपूर : कोरपणा नगरपंचायतीतील कचरा व्यवस्थापन, सफाई कामगारांचे वेतन आणि पीएफसह विविध प्रश्नांवरून सफाई कामगारांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) स्वर्गीय राजीव गांधी चौकात धरणे आंदोलन सुरू केले. कचरा व्यवस्थापनातील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सफाई कामगारांना शासन नियमानुसार वेतन आणि पीएफचा लाभ द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या कारभारातील विविध बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कचरा व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या वेतनातील कथित अनियमिततेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या नियमानुसार सफाई कामगारांना सुमारे २० ते २४ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित असताना काही कामगारांना प्रत्यक्षात केवळ १० हजार रुपये वेतन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सफाई कामगारांना पीएफचा लाभ मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन अनेक वर्षे उलटली असतानाही सफाई कामगारांच्या समस्या कायम असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नाल्या साफ करून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांच्या हक्कांवर अन्याय होत असल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन या आरोपांची दखल घेऊन काय भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली, किशोर बावणे, सुनील दरेकर, अमोल आसेकर, जोशना वैरागडे, वर्षा लांडगे, सविता तुमराम, नगरसेविका इंदिरा कोल्हे, पवन बुरेवार, मोहब्बत खान, संभा भुसारी, विजय पानघाटे, उमेश पालीवार, विनोद कुमरे, सुमित वैरागडे, अभय डोहे, हरबा झाडे, विजय जिवने, मोबिन बेग, गौरव मेश्राम यांच्यासह सफाई कामगार आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांनी सफाई कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देत न्याय मिळेपर्यंत आंदोलनाला साथ देण्याची भूमिका व्यक्त केली.