चंद्रपूर : राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा हरदोना (बुज) येथे झालेल्या खुनाच्या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा उलगडा अवघ्या एका तासात करून दोन्ही आरोपींना हत्यारासह ताब्यात घेण्यात राजुरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला यश मिळाले आहे. पतीच्या हत्या प्रकरणात पत्नी व तिचा प्रियकर दोघांनी मिळून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अशी घडली घटना
दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी जगदिश नाथुलाल मेघवंशी (रा. राजस्थान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मित्र राजेश मेघवंशी पत्नी जिया ऊर्फ दुर्गा हिच्या शोधासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आला होता. पत्नी हरदोना (बुज) येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावर राजेश व फिर्यादी तेथे गेले. तेथे राजेशची पत्नी तिच्या प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी सोबत दिसल्याने राजेशने त्याला जाब विचारला आणि वाद सुरू झाला. वादाच्या दरम्यान चंद्रप्रकाशने वरच्या मजल्यावर असलेल्या जियाला हत्याराची मागणी करत आवाज दिला. त्यानुसार जियाने घराच्या वरच्या मजल्यावरून तलवार खाली फेकली आणि त्या तलवारीने चंद्रप्रकाशने राजेशच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केली.
पोलिसांची वेगवान कारवाई – एका तासात दोन्ही आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना केल्या.पोलीस निरीक्षक सुमित परतेकि यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक सक्रिय करण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंबुजा फाटा, गडचांदूर येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच डीबी पथकाने चंद्रप्रकाश मेघवंशी,जिया ऊर्फ दुर्गा मेघवंशी या दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हत्या करण्यासाठी वापरलेली तलवारही जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पो.नि. सुमित परतेकि,सपोनि लक्ष्मण लोकरे,पोउपनि दीपक ठाकरे (डीबी प्रभारी),सफौ. किशोर तुमराम,पो.हवा. विक्की निर्वाण, अनुप डांगे,कैलास आलाम, रामेश्वर चाहारे, पो.अ. शफीक शेख,मिलिंद जामुडे,राजेश दुबे,बालाजी यमलवाड,महेश बोडगोलवार, रमेश बस्सी यांच्या पथकाने अवघ्या एका तासात खून प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणला.