File Photo (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उष्णतेतून दिलासा

तळोधी बाळापूरमध्ये जोरदार सरी, नागभीड-ब्रह्मपुरीत हलका पाऊस; तापमान 45 वरून 42 अंशांवर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांना कडाक्याच्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड उष्णतेचा कहर कायम होता. तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

नागभीड तालुक्याच्या मुख्य ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर याच तालुक्यातील तळोधी बाळापूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंदेवाही तालुक्यातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ब्रह्मपुरी येथेही रिमझिम सरींनी वातावरण प्रसन्न झाले.

या अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून 45 अंशांवर गेलेले तापमान 42 अंशांवर आले आहे. दिवसभराचा कडक उकाडा कमी होऊन संध्याकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत थंडगार वारे वाहत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लग्न समारंभांना या पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे उभारण्यात आलेले शामियाने काही ठिकाणी कोसळले किंवा विस्कळीत झाले, त्यामुळे आयोजकांची धावपळ उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT