चंद्रपुरात विविध समाज संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून संधी बंद?; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटले

चंद्रपुरातील सहविचार सभेत २८ जूनला भव्य मोर्चाचा निर्णय; ओबीसी जनगणनेतील स्वतंत्र कॉलम नसल्याने असंतोष

पुढारी वृत्तसेवा

Reserved Category Jobs

चंद्रपूर : राज्य सरकारने १४ मे रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविरोधात आता राज्यभरातील आरक्षित घटक संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. “राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव प्रवर्गातच नोकरी” या निर्णयाला विरोध करण्यासाठी चंद्रपुरात विविध समाज संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत येत्या २८ जून रोजी चंद्रपुरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

या सभेला ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या निर्णयामुळे आरक्षित घटकांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला.

राज्य सरकारच्या १४ मेच्या निर्णयानुसार, वयातील सवलत, शैक्षणिक पात्रतेतील सवलत, अनुभवातील सवलत तसेच परीक्षा शुल्क व परीक्षेला बसण्याच्या संधीतील सवलतींचा लाभ घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता केवळ राखीव जागांवरच होणार आहे. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागांवर निवड होण्याचा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचा अधिकार हिरावला जात असल्याची भावना सभेत व्यक्त करण्यात आली. अनेक वक्त्यांनी हा निर्णय सामाजिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

सभेत सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. “ओबीसींची स्वतंत्र नोंद नसेल, तर माहिती देणार नाही,” असा इशाराही काही प्रतिनिधींनी दिला. ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद शासनाने घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या २८ जून रोजी चंद्रपुरात होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सभेत करण्यात आले. विविध आरक्षित घटकांनी एकत्र येत सरकारविरोधात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT