Chandrapur News | वनसंपदेच्या शाश्वत वापरासाठी FIDC स्थापनेचा प्रस्ताव; मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांची सकारात्मक दखल!  
चंद्रपूर

Chandrapur News | वनसंपदेच्या शाश्वत वापरासाठी FIDC स्थापनेचा प्रस्ताव; मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांची सकारात्मक दखल!

मूल-सावलीतील मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुरक्षा साधने उपलब्ध करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : राज्यातील वनसंपदेचा शाश्वत व मूल्यवर्धित वापर, वनाधारित उद्योगांना चालना, गुंतवणूक वाढविणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्याच्या उद्देशाने Forest Industrial Development Corporation (FIDC) स्थापन करण्याची मागणी माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुनगंटीवार यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावाचा सर्वंकष अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत वनसंपदेचा केवळ संरक्षणात्मक दृष्टिकोन न ठेवता तिचा शाश्वत आणि मूल्यवर्धित वापर करून वनाधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. FIDCच्या माध्यमातून वनक्षेत्राशी संबंधित उद्योगांना चालना मिळण्यासोबतच गुंतवणूक आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.

दरम्यान, मूल आणि सावली तालुक्यांमध्ये वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाचाही बैठकीत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. सावली तालुक्यात दाखल झालेल्या सुमारे २५ रानहत्तींच्या कळपासह वाघ आणि इतर वन्यप्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवितासह शेती व मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली.

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर प्रभावी नजर ठेवण्यासाठी थर्मल ड्रोन, GIS आणि AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अत्याधुनिक इशारा यंत्रणा, अतिरिक्त गस्त वाहने आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

या मागण्यांची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी विभागाला तातडीने प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

वनसंवर्धनासोबत विकासाला चालना देणे आणि वन्यजीवांसोबत नागरिकांचे सुरक्षित सहअस्तित्व निर्माण करणे यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही सुरूच राहील, अशी भूमिका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT