Chandrapur Nylon Manja Seizure
चंद्रपूर : मकर संक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी जीवघेण्या आणि पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने केलेल्या धडक कारवाईत तब्बल २ लाख ४ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. १४) मकर संक्रांतीच्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने नाकाबंदी करत मोटारसायकलवरून नायलॉन मांजा वाहून नेत असलेल्या आरोपींना रंगेहाथ पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश खुशाल वेरकडे (वय ३२) रा. बियाणी पेट्रोल पंपाजवळ, चंद्रपूर आणि सौरभ लहानू वाढई (वय २६) रा. बिनबा गेटजवळ, चंद्रपूर अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या, मानवी जीवनास तसेच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १३७ प्लास्टिक चक्री आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण २,०४,००० किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी हा नायलॉन मांजा गौरव गोटेफोटे, रा. चंद्रपूर याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २९२, ४९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे व पोअं सुमीत बरडे यांचा समावेश होता.