चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थ विक्रीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करून ड्रग माफियांना हादरा दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी १६० ग्रॅम मेफोड्रॉन (एमडी) ड्रग्स आणि एक डिझायर कार (MH-49 AS-2704) असा एकूण १६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात नियमित गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, दिपक कृष्णा वर्मा (वय २८) रा. संजयनगर, चंद्रपूर व आशिष प्रकाश वाळके (वय ३०) रा. मित्रनगर, चंद्रपूर हे दोघे पांढऱ्या रंगाच्या डिझायर कारने एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी फॉरेस्ट अकादमी, मुल रोड परिसरात तात्काळ नाकाबंदी लावली. थोड्याच वेळात संशयास्पद कार दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्या वेळी चालक दिपक वर्मा याच्याकडून १६० ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) पावडर मिळून आली. ड्रग्ससह कार जप्त करण्यात आली असून, एकूण १६,१२,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ,पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवयरे, पोहवा रजनिकांत पुष्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि शशांक बदामवार, पोशि हिरालाल गुप्ता, आणि पोशि अजित शेडे यांच्या पथकाने केली.
ड्रग्सविरोधी मोहिमेत पोलिसांचे सलग यश
चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सातत्याने कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वीही ड्रग्ज तस्करीशी संबंधित गुन्हे उघडकीस आले होते. या नव्या कारवाईमुळे पोलिसांनी आणखी एक ड्रग नेटवर्कचा धागा पकडला असून, या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.