Chandrapur Stolen Property Recovered
चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ३ कोटी ५९ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालक व फिर्यादींना सन्मानाने परत केला. भारतीय न्याय संहितेच्या नव्या कायद्यानुसार राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमांतर्गत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता तुकूम येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात भव्य मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पार पडला.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते संबंधितांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.या सोहळ्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडी, वाहन चोरी, आर्थिक फसवणूक आदी गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला मौल्यवान मुद्देमाल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आला.
पडोली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील अशोक लेलँड ट्रक, ३४२ गॅस सिलेंडर्स आणि रोख रक्कम, असा एकूण ३९ लाख ६८ हजार ५३१ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. तसेच राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेले ३१ लाख रुपये किमतीचे टाटा आयशर वाहन मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.
याशिवाय विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या रॉयल एनफील्ड बुलेट, होंडा शाईन, स्प्लेंडर, अॅक्सेस मोपेड यांसह इतर दुचाकीही शोधून मूळ मालकांना परत देण्यात आल्या.
रामनगर, बल्लारपूर, सावली आणि घुग्घूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांत हस्तगत केलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिनेही तक्रारदारांना परत करण्यात आले. यामध्ये सोन्याच्या पाटल्या, चपलाकंठी, पोत, अंगठ्या, लॉकेट, सोन्याचे लगड, चांदीची भांडी आणि नाणी यांचा समावेश आहे.
या कारवाईत रामनगर येथे १ कोटी ३४ लाख १६ हजार, बल्लारपूर येथे १ कोटी १८ लाख २३ हजार, सावली येथे १ कोटी १४ लाख ७५ हजार आणि घुग्घूस येथे १५ लाख ४१ हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले होते.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांसाठीही पोलिसांनी मोठी दिलासादायक कामगिरी केली. सायबर सेलच्या NCCRP प्रणालीच्या माध्यमातून तातडीने कारवाई करून तब्बल १ कोटी १२ लाख ४८ हजार २३७ रुपये संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले.
विविध गुन्ह्यांमध्ये पडोली आणि रामनगर पोलिसांनी जप्त केलेली १९ लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आली.
हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात आले आणि तेही संबंधित तक्रारदारांना थेट सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमामुळे गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच नागरिकांचा चोरी गेलेल्या मालाबाबतचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपास यंत्रणा, सायबर सेल आणि विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात नागरिकांना त्यांच्या हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.