चंद्रपूर : घरफोडी करून चोरी गेलेल्या १.३६ लाख रुपयांच्या मालामधून १२ तासांत १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करत भद्रावती पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणात फिर्यादी अजय विजय माडोत (वय ३०, रा. तांडा, भद्रावती) हे कुटुंबासह १२ जून २०२५ रोजी बाहेरगावी गेले असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे मुख्य दरवाज्याचे कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,३६,००० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या तक्रारीवरून भद्रावती पोलीस स्टेशन येथे अप. क्र. २६६/२०२५ भादंवि कलम ३३१ (३)(४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक बातमीदारांच्या साहाय्याने आरोपीचा शोध सुरू केला. तपासात आरोपी सोनू रामदास धारावत (वय ४०, रा. बरांज मोकासा तांडा, भद्रावती) याचा तपासात समावेश झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सुमारे १,३५,००० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज परिसरात पाण्याच्या बाटलीसाठी गेलेल्या व्यक्तीला धमकावत त्याच्याकडील ५० हजार जबरीने हिसकावणाऱ्या आरोपीस रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्यांचेकडून 50 हजार रुपये जप्त करण्यात आली आहे.
ही घटना १३ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी मधुराम तुलसींग कोल्हा (वय ३४, रा. कोडाखुरी, ता. द्रककॉड, जि. कांकेर, छत्तीसगड) हे सपना टॉकीज जवळील जलनगर वॉर्ड, चंद्रपूर येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले असता, एक अज्ञात इसम त्यांच्या मागून येऊन तोंड दाबून खिशातील ५०हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळून गेला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४७०/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३०९(६) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर तत्काळ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात गुप्त बातमीदारांची मदत, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासात शेख जुबेर शेख कादर (वय ३३, रा. रहमतनगर, चंद्रपूर) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेली पूर्ण ५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.