प्रातिनिधीक छायाचित्र Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Police | कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर पोलिसांचा बडगा; 'सायलेन्स चंद्रपूर' मोहीम सुरू!

अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर जप्त होणार; वाहनचालकांवर दंडासह गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर :  चंद्रपूर  शहरासह जिल्ह्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 'सायलेन्स चंद्रपूर' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. वाहनांमध्ये कंपनीच्या अधिकृत सायलेन्सरऐवजी अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्कश आवाज तसेच फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट आणि अन्य दुचाकी चालकांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अनधिकृत सायलेन्सर जप्त करण्यासह संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॉडिफाईड सायलेन्सरमधून निघणाऱ्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर अशा आवाजाचा विपरीत परिणाम होत आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या वाहनचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान दुचाकी आणि बुलेट चालकांनी वाहनांसोबत कंपनीने दिलेला अधिकृत सायलेन्सर वापरणे बंधनकारक आहे. वाहन चालविताना सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढणे किंवा अनावश्यक कर्कश आवाज निर्माण करणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये बसविलेले अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त करण्यात येतील, तसेच ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

नागरिकांनाही तक्रार करण्याचे आवाहन

'चला, चंद्रपूर शांत ठेवूया ' या उपक्रमात नागरिकांनीही सहभागी होऊन ध्वनी प्रदूषणाविरोधात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिसरात किंवा रस्त्यावर कर्कश आवाज करणारे वाहन आढळल्यास त्या वाहनाच्या नंबर प्लेटसह स्पष्ट दिसणारा फोटो काढून चंद्रपूर पोलिसांच्या अधिकृत WhatsApp क्रमांक 9404110456 वर पाठवावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून संबंधित वाहनचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT