चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच कुटुंबातील पिता-पुत्राला अटक केली. आनंदनगर, महाकाली कॉलरी परिसरातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी १९.२२० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. शुभम संजय वासेकर (वय २४) आणि संजय महादेव वासेकर (वय ५२) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत ४२ हजार २८४ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला गुरूवारी (दि.१२ ) आनंदनगर, महाकाली कॉलरी परिसरात अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून घराची झडती घेतली. यावेळी १९.२२० ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. त्यांच्यावर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे यांच्यासह पोलीस हवालदार संजय धोटे, संतोष दंडेवार, पोलीस अंमलदार कपुरचंद खरवार, योगेश पिदुरकर, खंडेराव माने, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रशांत कुसारे, सुशांत घिवे आणि महिला पोलीस अंमलदार लीना काटवले यांचा समावेश होता.