Ballarpur gang MCOCA action
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील कुख्यात गुंड टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खून, दरोडा, खंडणी, शस्त्रसाठा बाळगणे, पोलिसांवर हल्ला, दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका उघड करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी ०२ माऊझर पिस्टल, ०२ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतूस आणि ४ धारदार खंजीर जप्त केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला खून व दरोड्याचा कटही उधळून लावण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर भागात गेल्या काही वर्षांपासून चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी आणि येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी टोळी सक्रिय होती. या टोळीने आपल्या वर्चस्वासाठी खूनाचा प्रयत्न, शस्त्रांच्या जोरावर दहशत, खंडणी मागणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, पोलिसांवर हल्ला आणि सामान्य नागरिकांना दहशतीखाली ठेवण्याचे अनेक गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात उघड झाले.
दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर टोळी गंजवार्ड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला असता, गुन्हेगारांकडून ०२ माऊझर पिस्टल,०२ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे,०४ धारदार लोखंडी खंजीर आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ही टोळी दरोड्यानंतर मिळालेल्या पैशातून खुनाचा मोठा कट रचण्याच्या तयारीत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. परंतु पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य खून प्रकरण रोखण्यात यश आले. टोळीने मागील काही वर्षांत बेकायदेशीर जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, धमकी, दंगल, मालमत्तेची नासधूस, शासकीय कामात अडथळा, प्राणघातक हल्ला, पोलिसांवर हल्ला, शस्त्र बाळगणे, दहशत वर्चस्व निर्माण करणे, अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिका राबवली असल्याचे स्पष्ट झाले.
मोक्का अंतर्गत कारवाई
या टोळीचे संघटीत स्वरूप, दहशतीचे वातावरण, नागरिक व प्रशासनावर धाक आणि सातत्याने गुन्हे करण्याचे स्वरूप लक्षात घेता, पोलिसांनी कठोर पाऊल उचलत त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) लागू केला आहे. मोक्का अंतर्गत आरोपी चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी (वय २३),येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (वय २७), मुकेश राजू वर्मा (वय २०), अमित बालकृष्ण सोनकर (वय २६), गौरिश श्रीनिवास कुसमा (वय १९) अन्वर अब्बास शेख (वय २३) यांचेसह अन्य साथीदारांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके (ठाणेदार, चंद्रपूर शहर), पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सहायक फौजदार अरुण खारकर, पोलीस अंमलदार गजानन नन्नावरे यांच्या पथकाने केली.