चंद्रपूर

पैनगंगा नदीत पोकलेनचा कहर! घाट लिलाव होताच नदी पोखरण्यास सुरुवात

कोरपना तालुक्यातील कारवाई आणि कोडशी वाळू घाटांवर नियमांना हरताळ

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कारवाई आणि कोडशी येथील वाळू घाटांचा लिलाव होताच, पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे थेट नदीपात्रात पोकलेन मशीन उतरवून नदीचे खोदकाम सुरू असल्याने वाळू धोरणाचा सर्रास भंग होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या प्रकारामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला धोका निर्माण झाला असून भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणि जड वाहने दाखल झाली. नदीपात्रातून दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नियमांनुसार नदीपात्रात थेट यंत्राच्या साहाय्याने उत्खननास अनेक निर्बंध असतानाही पोकलेन मशीनद्वारे खोदकाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांच्या मते, अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडत असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. नदीपात्र अधिक खोल झाल्यास भविष्यात शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात आधीच पाणी समस्येला सामोरे जाणाऱ्या गावांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गावातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि दैनंदिन प्रवासी यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित महसूल प्रशासन आणि खनिज विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. पैनगंगा नदीपात्रातील अवैध व अनियंत्रित उत्खनन तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT