चंद्रपूर

चंद्रपूरात धान पिकावर ‘मंड्या’ तणाचे मोठे संकट; शेतकरी आर्थिक अडचणीत

नागभीड तालुक्यासह विदर्भात वाढता प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूरमध्ये सध्या ‘मंड्या’ नावाच्या नव्या तणाने धान पिकावर मोठे संकट निर्माण केले आहे. नागभीड तालुक्यातील चिंधीचकसह अनेक भागांत या तणाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असून, धानासारखेच दिसणारे हे तण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे धान उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असून, विविध प्रजातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील तांदळाला देशाबरोबरच परदेशातही मागणी असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात धान लागवड करतात. मात्र, यंदाच्या खरीप आणि उन्हाळी हंगामात ‘मंड्या’ नावाच्या तणाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले आहे. विशेषतः नागभीड तालुक्यातील चिंधीचक सह अनेक गावांमध्ये या तणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. सुरुवातीच्या अवस्थेत हे तण धान पिकासारखेच दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते ओळखणे कठीण जाते.

वाढीच्या पुढील टप्प्यात मात्र हे तण धानापेक्षा उंच वाढते आणि त्याचा बुंधा मजबूत असल्यामुळे धानाच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी, धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. या तणाला येणारे लहान दाणे परिपक्व झाल्यानंतर पुन्हा शेतात पडतात आणि त्याचा प्रसार झपाट्याने वाढतो. शेतकरी सध्या पारंपरिक निंदन पद्धतीने या तणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, धान आणि तण यामधील फरक ओळखणे कठीण असल्यामुळे निंदन प्रभावी ठरत नाही. शिवाय, मोठ्या प्रमाणात तण वाढल्यामुळे मजुरीचा खर्चही वाढत आहे. विशेष म्हणजे, खत व कीडनाशकांचा वापर केल्यानंतर हे तण अधिक जोमाने वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे समस्या अधिकच गंभीर बनत आहे.

यापूर्वी गाजर गवत आणि अमरवेल यांसारख्या तणांनी शेतीला मोठा फटका दिला होता. त्यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले असले तरी पूर्ण निर्मूलन अद्याप झालेले नाही. सध्याचे ‘मंड्या’ तण हे त्यापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या तणाचा उगम नेमका कुठून झाला—बियाण्यातून, औषधांमधून की इतर कोणत्या मार्गाने—याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, मागील वर्षी कमी प्रमाणात दिसणारे हे तण यंदा मोठ्या प्रमाणात वाढले असून आता ते विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पसरत असल्याची माहिती समोर येत आहे.

जर वेळेत या तणावर नियंत्रण मिळवले नाही, तर भविष्यात धान उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी शासन आणि कृषी विभागाकडून तातडीने मार्गदर्शन आणि प्रभावी उपाययोजनांची मागणी करत आहेत. ‘मंड्या’ तणाच्या नियंत्रणासाठी विशेष मोहिम राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. योग्य तांत्रिक मार्गदर्शन, औषधांची उपलब्धता आणि व्यवस्थापनाच्या पद्धतींची माहिती दिल्यास या संकटावर मात करता येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT