Brahmapuri schools closed
चंद्रपूर: मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात सुरू असलेला संततधार पाऊस व वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या 10 जुलैला हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उद्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले असून सुटी घोषित केली आहे.
भारतीय हवामान विभागाने 10 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी “ऑरेंज अलर्ट” जाहीर केला असून, जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने वैनगंगा नदीपात्रात 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान, ब्रह्मपुरी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दोन्ही दिवस रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. यामुळे वैनगंगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30(2)(5) व (18) अन्वये 10 जुलै 2025 रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशानुसार, सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तथापि, या आदेशाचा फायदा केवळ ब्रह्मपुरी तालुक्यातील संस्थांनाच होणार असून इतर तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये यासाठी लागू राहणार नाहीत. सुट्टी असली तरी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्या, 10 जुलै 2025 रोजी भारतीय हवामान विभागाने "ऑरेंज अलर्ट" घोषित केला आहे. या अलर्टनुसार जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांचे पाणीपातळी वाढण्याचा, शहर व ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.