चंद्रपूर : आता शाळा व्यवस्थान समिती देणार मोफत गणवेश file photo
चंद्रपूर

चंद्रपूर : आता शाळा व्यवस्थान समिती देणार मोफत गणवेश

Free Uniforms: जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये असलेल्या शाळा व्यवस्थापन समिती मार्फतच इयत्ता 01 ते 08 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. 2024-25 या शैक्षणिक सत्रात हे गणवेश केंद्रीकृत पद्धतीने वाटप करण्यात येत होते.यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या.परिणामी लाखो विद्यार्थ्यांना गणवेशाविना शाळा गाठावी लागली. आता शासनाने निर्णयात बदल केल्याने 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची जवाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीकडे आली आहे.या निर्णयामुळे 'एक राज्य एक गणवेश या योजनेचा  लाभ जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.1 ली ते इ.8 वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे.

समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.1 ली ते इ.8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून'एक राज्य एक गणवेश' या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दि.08 जून, 2023, दि.18 ऑक्टोंबर,2023 व दि.10 जून, 2024अन्वये देण्यात आल्या आहेत.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पध्दतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी त्यानुषंगाने  लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पध्दतीने देण्यात यावा, अशी मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.यावर आता निर्णय झाला असून शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार देण्यात आले आहे.

अशी करावयाची आहे योजनेची अंमलबजावणी

मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणोच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करायच्या आहेत.

'एक राज्य एक गणवेश' या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एक सारखे दोन गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट/पँट अशी असावी. तसेच, विद्यार्थीनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळया रंगाचा पिनो-फ्राँक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाचा स्कर्ट तसेच, ज्या शाळांमध्ये विद्यार्थीनीना सलवार-कमीज असा गणवेश असेल तर गडद निळया रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी.

विद्यार्थीनींसाठी निवड स्वातंत्र्य

विद्यार्थीनीना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रक्कमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्तेनिहाय पिनो-फ्राँक, शर्ट-स्कर्ट, सलवार-कमीज देण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे.यासोबतच योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT