चंद्रपूर

Chandrapur News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याविरोधी काँग्रेसचा मोर्चा

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: मूल तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसून पिकांची नासधूस करणाऱ्या वन्य प्राण्यांनी हजारो शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले आहे. मानव वन्यजीव संघर्षातून अनेकांचे बळी गेले. वनविभाग या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांना घेऊन आज सोमवारी काँग्रेसचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसने आक्रमक होऊन वनविभाग व राज्यसरकारचा निषेध नोंदविला. (Chandrapur News)

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल हा धान उत्पादक तालुका म्हणून परिचित आहे. सध्या धानपिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या शेतात धान पीक उभे आहे. मुल तालुक्याला जंगलपरिसरात वन्यप्राणी रानडुकरांनी शेतात घुसून हौदोस घालीत पिकांचे नुकसान केले आहे. नुकसानीचे वनविभागामार्फत पंचनामे केले जातात मात्र नुकसान भरपाई रूपात तोकडे व अत्यल्प मदत देऊन वनविभाग शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. शेतकरी व शेतमजूरांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले आहेत. वनमंत्र्यांच्या मतदार संघातील मुल तालुक्यात या गंभीर समस्यांकडे वन विभागासह वनमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात हजारोंच्या संख्येत शेतकऱ्यांनी मूल तहसीलवर धडक दिली. वड्डेटीवार यांनी बैलगाडी चालवून सरकारचा शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांवरून समाचार घेतला.

यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, शिवा राव, महिला काँग्रेसच्या माजी जिल्ह्याध्यक्ष चित्रा डांगे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमिज शेख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, घनश्याम येनुरकर, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन निलमवार, महीला काँग्रेसच्या अध्यक्ष रूपाली संतोषवार, नलिनी आडपेवार यांचेसह मुल तालुका काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, शेतकरी शेतमजूर, महिला व युवकांची उपस्थिती होती.

बाजार समितीपासुन तहसिल कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. विजय वडेट्टीवार आणि संतोषसिंह रावत यांनी बैलगाडी चालवून सरकारवर हल्लाबोल केला. तहसील कार्यालय परिसरात जाहीर सभेत संबोधित करताना वडेट्टीवार यांनी, देशात धर्मांधता पसरवून, जाती जातींमध्ये भांडणे लावून अराजकता माजविल्या जात आहे. अच्छे दिनाचे खोटे वादे करून महागाई वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जात आहे. भाजप नेत्यांच्या कंपन्या व दुकानदारी चालविण्यासाठी खाजगीकरणातून कंत्राटी भरती करून युवकांचे भविष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या निर्दयी व भ्रष्ट सरकारला जाग आणण्यासाठी आता संघर्षाचा मार्ग पत्करावा लागणार आहे.

निवडणुकांमध्ये भाजपाला पायउतार केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.मनुष्याच्या जीवावर उठणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने स्वतः करावा अन्यथा धुडगूस घालणाऱ्या व हल्ले चढवणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रत्येक शेतकऱ्याला अधिकृत परवानगी देऊन शस्त्र वाटप करावे. वनविभागाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. असा सज्जड इशारा दिला. मुलचे तहसीलदार यांना लेखी निवेदन मोर्चाची सांगता करण्यात आली.

SCROLL FOR NEXT