चंद्रपूर

Chandrapur News : चंद्रपूरला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; वसूमना पंत यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करत महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी दिले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी वसूमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यात नवीन प्रशासकीय नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशात महत्त्वाचा निर्णय घेत वसूमना पंत यांची जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्या सध्या छत्रपती संभाजीनगर येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत.

शासनाच्या आदेशानुसार, त्यांची नियुक्ती सध्याचे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या जागी करण्यात आली आहे. तर विनय गौडा यांची नियुक्ती (भा.प्र.से.) अन्य विभागात करण्यात आल्याची माहिती शासनाच्या आदेशात नमूद आहे.

शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार, वसूमना पंत यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार महापालिका आयुक्तांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून, त्वरित नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, त्या लवकरच जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतील.

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार असून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून धुरा सांभाळणार असल्याने हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT