Chandrapur News शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल! चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार! 
चंद्रपूर

Chandrapur News शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल! चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार!

चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आश्रमशाळा : शिस्तीच्या नावाखाली अधीक्षकांचा मनमानी कारभार?; संतप्त पालकांकडून कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुरक्षित, सन्मानाचे आणि आनंदी वातावरण मिळावे, अशी अपेक्षा असताना चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केस कर्तनासाठी आलेल्या नाभिकाकडून एका विद्यार्थ्याचे चक्क अर्धे टक्कल करण्यात आल्याने आश्रमशाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिस्तीच्या नावाखाली अधीक्षकांनी संतापाच्या भरात हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप होत असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत येणारी ही निवासी आश्रमशाळा असून येथे सुमारे साडेपाचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. निवासी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि शिस्तीची जबाबदारी शाळा प्रशासनावर आहे. विद्यार्थ्यांचे केस कर्तन करण्यासाठी आदिवासी विभागाकडून शासनस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या नाभिकाची व्यवस्था करण्यात आली असून, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस केस कर्तनासाठी निश्चित करण्यात आले आहेत.

शनिवारी दुपारी घडला प्रकार

शनिवारी दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे केस कर्तन सुरू होते. काही विद्यार्थ्यांचे केस कापण्याचे काम सुरू असताना इतर काही विद्यार्थी परिसरात खेळत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे संतप्त झालेल्या अधीक्षकांनी संबंधित नाभिकाला विद्यार्थ्याचे अर्धे टक्कल करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. तब्बल 82 विद्यार्थ्यांचे ट्रिमर च्या सहायाने केस कापण्यात आल्याने ते विचित्र अवस्थेत राहिले. या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम झाला, त्याला मानसिक त्रास झाला का आणि त्याची संमती घेण्यात आली होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘शिस्त’ की संतापाचा उद्रेक?

आदिवासी आश्रमशाळेत शिस्त राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी विद्यार्थ्यांना अपमानित करून अथवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचेल अशा पद्धतीने शिस्त लावणे योग्य आहे का, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्याने काही शिस्तभंग केला असेल तर नियमानुसार समज देणे किंवा शाळेच्या शिस्तीच्या चौकटीत कारवाई करणे अपेक्षित असताना थेट केस कर्तनाच्या माध्यमातून शिक्षा देण्यात आली का, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी संबंधित अधीक्षक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते, अशी चर्चा परिसरात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या बाबीचीही संबंधित विभागाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत  मुख्याध्यापकांनी  अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मात्र, केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून हा प्रश्न संपणार नसून, विद्यार्थ्याचे अर्धे केस कापण्याचा निर्णय  कोणत्या कारणातून घेण्यात आला, त्याला अशी शिक्षा देण्याचे अधिकार कोणाला आहेत आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी पालकांकडून होत आहे.

पालकांकडून अधीक्षकांसह मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी

या प्रकाराची पालकांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित अधीक्षकांसह मुख्याध्यापकांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची जबाबदारीही प्रशासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

आदिवासी विभागाच्या कारवाईकडे लक्ष

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून निवासी आश्रमशाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याची बाजू ऐकून घ्यावी, घटनेमागील वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. आता चिमूर आदिवासी प्रकल्प तसेच आदिवासी विभाग या गंभीर प्रकाराची कशी दखल घेतो आणि संबंधितांवर कोणती कारवाई करतो, याकडे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्याध्यापकांनी दिले स्पष्टीकरण; अधीक्षकांना नोटीस

या प्रकरणाबाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी सांगितले की, “महत्त्वाच्या कामानिमित्त एका तासासाठी चिमूरला गेलो होतो. परत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकाराची माहिती दिली. संबंधित अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT