चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी करत विद्यमान गटनेते राजेश मुरली अडूर यांची नोंदणी रद्द केली. काँग्रेसच्या २७ सदस्यांपैकी १६ नगरसेवकांनी अडबाले यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील धानोरकर-वडेट्टीवार संघर्षात धानोरकर गटाने महत्त्वाची बाजी मारल्याचे मानले जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून पक्षाचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, महानगरपालिकेतील सत्तास्थापनेपासूनच पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला.
या पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी काँग्रेसच्या २७ पैकी १६ नगरसेवकांनी झालेल्या बैठकीत विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना हटवून सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड केली. या निर्णयाला बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असल्याने त्याची नोंद घेण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती.
नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, काँग्रेसच्या २७ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी सुरेंद्र अडबाले यांना गटनेता म्हणून मान्यता दिली असून त्यांना बहुमताचा पाठिंबा आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ अंतर्गत त्यांची गटनेते म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार यापूर्वी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजेश अडूर यांची काँग्रेस पक्ष/गटनेता म्हणून करण्यात आलेली नोंदणी तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर १७ जून २०२६ पासून सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेस गटनेते म्हणून अधिकृत नोंद अभिलेखात घेण्यात आली आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनील हरिभाऊ काळे विरुद्ध अविनाश गुलावराव मार्डीकर व इतर (सिव्हिल अपील क्र. २०८०/२०१५) या निकालाचाही आधार घेण्यात आला आहे. या निकालात महानगरपालिका किंवा नगरपरिषदेमधील पक्ष किंवा आघाडीचा नेता निवडण्याचा अधिकार संबंधित गटाच्या सदस्यांना असून, मूळ राजकीय पक्षाचा त्यात थेट हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. गटनेतेपदाच्या माध्यमातून मनपातील विरोधी पक्षाच्या नेतृत्वावर आता धानोरकर समर्थकांचे नियंत्रण आले असून, वडेट्टीवार गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी काळात मनपातील काँग्रेसची भूमिका, विरोधी पक्षाची रणनीती आणि पक्षांतर्गत राजकारण कोणते वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.