Bar Ban Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | कुंटणखान्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिअर बारचा परवाना कायमचा रद्द

जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला आदेश

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमुर शहरातील आझाद वॉर्ड परिसरात असलेल्या वनिता बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंटच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अखेर संबंधित बिअर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी १६ जून २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे.

चिमुर येथील आझाद वॉर्ड येथील वनिता बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंटची संचालिका वनिता जगन रंगारी ही बारच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर बाहेरील महिलांकडून देहव्यवसाय करून घेत आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात असून, ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेतील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवून संबंधित महिलांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची गोपनीय माहिती  १६ मे २०२६ रोजी पोलिसांना मिळाली होती की.या माहितीच्या आधारे  पोलिसांनी खाजगी ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर बिअर बारवर छापा टाकण्यात आला असता तेथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान एका पीडित महिलेला मुक्त करण्यात आले.

महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या तक्रारीवरून चिमुर पोलीस ठाण्यात आरोपी वनिता रंगारी हिच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ (पीटा अॅक्ट) मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला चंद्रपूर कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी पाठविले.

विशेष म्हणजे हा बिअर बार अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात आहे. बारच्या परिसरात तीन मशिदी आणि एक बुद्ध विहार अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. तसेच येथे येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरातील महिला, मुली व प्रतिष्ठित नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. स्थानिक नागरिकांनी हा बिअर बार बंद करण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर केली होती.

तपासादरम्यान वनिता रंगारी ही बिअर बारच्या नावाखाली प्रत्यक्षात कुंटणखाना चालवत असल्याचे आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचे शोषण करत असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेश त्र्यंबक लबडे यांनी सखोल व अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अबकारी विभागाकडूनही स्वतंत्र वस्तुस्थिती अहवाल मागविला. अबकारी विभागाचा अहवालही पोलिसांच्या निष्कर्षांना पूरक असल्याचे आढळून आले. त्यानंतर वनिता रंगारी हिच्या नावावरील बिअर बार परवाना (अनुज्ञप्ती क्रमांक FL-III-446) कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT