चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रुपाळा मेंढा (आकापूर) गावातील एका छोट्या तलावात रात्रीच्या वेळी पाण्यातून दर मिनिटाला पिवळसर रंगाचा मंद प्रकाश लुकलुकताना दिसत असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या या रहस्यमय प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, काहींनी याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे. तर या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत.
रुपाळा मेंढा (आकापूर) गावाशेजारी असलेला हा छोटा तलाव ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी तसेच कपडे धुण्यासाठी वापरतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी या तलावाच्या पाण्यातून दर मिनिटाच्या अंतराने पिवळसर रंगाचा मंद प्रकाश चमकताना दिसत आहे. पाण्याच्या तळातून अचानक प्रकाश बाहेर पडत असल्याचा भास होत असल्याने ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत.
या अनोख्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच रुपाळा मेंढा (आकापूर) सोबतच चौगान, जुगनाळा, गवर्ला, जवराबोडी आणि कसर्ला परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी तलावाकडे मोठी गर्दी केली. हा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रांग लागत असून, तलाव परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे तलावालगतच हनुमानाचे मंदिर असल्यामुळे काही भाविकांनी या घटनेकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे. काही ज्येष्ठ नागरिकांच्या मते, हा एखादा दैवी संकेत किंवा अलौकिक शक्तीचा प्रभाव असू शकतो. त्यामुळे काहींनी मंदिरात पूजा-अर्चना करून या घटनेला धार्मिक स्वरूप देण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे.
दुसरीकडे, या प्रकाशामागे नेमके वैज्ञानिक कारण काय असू शकते, याबाबतही चर्चा सुरू आहेत. पाण्यात पडलेले एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण, बॅटरी अथवा प्रकाश निर्माण करणारे साधन, पाण्यातील काही रासायनिक अभिक्रिया किंवा जैविक प्रक्रियेमुळे हा प्रकाश निर्माण होत असावा, असा अंदाज काही नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच मेंडकी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तलाव परिसराची पाहणी केली. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवू नये तसेच सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पाण्यातून दर मिनिटाला दिसणाऱ्या या पिवळसर प्रकाशामागील नेमके सत्य काय, याचा उलगडा होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित तज्ज्ञांकडून वैज्ञानिक तपासणी झाल्यानंतरच या रहस्यमय घटनेमागील वास्तव समोर येणार असून, तोपर्यंत रुपाळा मेंढा येथील हा तलाव संपूर्ण परिसरासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.
रुपाळा मेंढा (आकापूर) येथील तलावात दिसणाऱ्या पिवळसर लुकलुकणाऱ्या प्रकाशाबाबत भूगर्भ संशोधक सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा प्रकार काजव्यांमुळे घडत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करणारा काजवा हा महाराष्ट्रातील एकमेव कीटक असून, जंगल परिसरात अशा प्रकारचा प्रकाश अनेकदा पाहायला मिळतो.
सुरेश चोपणे यांनी सांगितले की, हजारो काजवे एखाद्या ठिकाणी एकत्र आल्यास त्यांच्या प्रकाशामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा परिसरात अशाच प्रकारचा चमचमणारा व लुकलुकणारा उजेड दिसू शकतो. त्यामुळे तलावात दिसणाऱ्या या प्रकाशामागे काजव्यांचा समूह असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन वैज्ञानिक निरीक्षण केल्यानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या रहस्यमय प्रकाशाबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुनिष्ठ तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.