चंद्रपूर : चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील चिकली चक क्र. २ येथील बिगर वनक्षेत्रात सुमारे ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील चितेगाव बिट आणि राजोली राऊंड अंतर्गत येणाऱ्या सर्व्हे क्रमांक ७८, चिकली चक क्र. २ येथे मंगळवारी (३० जून) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एका वाघाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, मृत वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे ६ ते ७ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे.
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचा मृत्यू एक दिवसापूर्वी झाला असावा. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वाइल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे (WPSI) प्रतिनिधी मुकेश भांदककर, इको-प्रोचे प्रतिनिधी राजू काहीलकर यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी (NTCA) प्रतिनिधींच्या उपस्थितीत मृतदेहाची सविस्तर पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, कोणत्याही अवयवाची हानी झालेली नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन राजोली रोपवाटिकेत करण्यात आले आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी विनोद धुर्वे यांनी दिली.