Chandrapur News शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल!  
चंद्रपूर

Chandrapur News : जांभूळघाट आश्रमशाळेतील टक्कल प्रकरणी अधीक्षकांचा पदभार काढला!

पालकांच्या संतापानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांची थेट शाळेत चौकशी; अहवाल अपर आयुक्तांकडे, कारवाईचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे टक्कल करण्यात आल्याच्या प्रकाराने आता गंभीर वळण घेतले आहे. पालकांच्या तीव्र विरोधानंतर आश्रमशाळेचे अधीक्षक प्रशांत आत्राम यांचा पदभार काढून तो पिसे शिक्षकाकडे  सोपविण्यात आला आहे. दरम्यान, चिमूर आदिवासी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी प्रत्यक्ष आश्रमशाळेत जाऊन घटनेची चौकशी केली असून, त्याबाबतचा अहवाल पुढील कारवाईसाठी आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत जांभूळघाट येथे निवासी आदिवासी आश्रमशाळा असून येथे सुमारे साडेपाचशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे केस कर्तन करण्याची व्यवस्था आदिवासी विभागाकडून करण्यात येते. दर महिन्याला विद्यार्थ्यांची साधी पद्धतीने केस कर्तन केली जाते. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांचे टक्कल आणि अर्ध टक्कल करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.

रात्री चार वाजेपर्यंत सुरू होते केस कर्तन

शनिवारी दुपारी सुमारे चार वाजतापासून विद्यार्थ्यांना केस कर्तनासाठी बोलावण्यात आले होते. यासाठी एका नाभिकाला बोलावण्यात आले होते. मात्र, अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार 82  विद्यार्थ्यांचे अर्धटक्कल  करण्यात आले त्यानंतर त्याच विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे पूर्ण टक्कल करण्यात आले, तर आणखी दहा ते अकरा विद्यार्थ्यांचे वेगळ्या पद्धतीने अर्ध टक्कल करण्यात आले. 267 विद्यार्थ्यांची ही प्रक्रिया दुपारी चार वाजता सुरू होऊन पहाटे चार वाजेपर्यंत चालल्याची माहिती आहे.

यापूर्वी असा प्रकार घडला  नाही

या आश्रमशाळेत सुमारे २६७ मुले शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. ह्या सर्व मुलांच्या केसांचीही कर्तन करण्यात आली असून, त्यांचे केस टक्कलसदृश पद्धतीने कापण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, यापूर्वी विद्यार्थ्यांची नेहमी साध्या पद्धतीने कटिंग केली जात होती. अशा प्रकारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे टक्कल करण्याचा प्रकार यापूर्वी कधीही घडला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावेळी नेमके असे निर्देश का देण्यात आले, विद्यार्थ्यांचे केस कर्तन करण्याची पद्धत अचानक का बदलण्यात आली आणि यासाठी कोणाच्या सूचना होत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालकांची आश्रमशाळेवर धडक

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सोमवारी मोठ्या संख्येने पालकांनी आश्रमशाळेत धडक दिली. अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे पुन्हा अधीक्षकपदाची जबाबदारी देऊ नये, अशी जोरदार मागणी पालकांनी केली. पालकांनी आपली मागणी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्यासमोरही ठामपणे मांडली. यावेळी कुमरे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच संबंधितांकडून चौकशी केली.

पदभार काढताच पालकांचा रोष काहीसा कमी

अधीक्षकांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी किंवा मुख्याध्यापकांकडे नसल्याचे पालकांना सांगण्यात आले. त्यामुळे घटनेचा अहवाल आणि कारवाईचा प्रस्ताव आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंह यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. तसेच अधीक्षक प्रशांत आत्राम यांचा पदभार तत्काळ काढून तो पिसे नामक शिक्षकाकडे सोपविण्यात आल्याने पालकांचा रोष काही प्रमाणात कमी झाला. मात्र, केवळ पदभार काढून न थांबता संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी कायम ठेवली आहे.

चौकशी अहवाल अपर आयुक्तांकडे

प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असून, त्याचा अहवाल अपर आयुक्त आरुषी सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या अहवालाच्या आधारे आता आदिवासी विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे केस कर्तन करण्यासाठी नियमित व्यवस्था असताना, अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे टक्कल करण्यामागील कारण काय होते, अधीक्षकांनी नेमक्या कोणत्या सूचना दिल्या आणि संबंधित नागरिकाने कोणाच्या निर्देशानुसार केस कापले, या सर्व बाबी चौकशीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही सुविधांअभावी विद्यार्थ्यांचे आंदोलन

जांभूळघाट आश्रमशाळा यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. शाळेत आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी यापूर्वी आंदोलन पुकारले होते.  त्यानंतर आता विद्यार्थ्यांचे पूर्ण तसेच अर्धे टक्कल करण्यात आल्याच्या प्रकाराने पुन्हा एकदा आश्रमशाळेतील प्रशासनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

आता प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालावर अपर आयुक्त आरुषी सिंह काय निर्णय घेतात, अधीक्षकांवर कोणती विभागीय कारवाई होते आणि जांभूळघाट आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व सन्मानाबाबत प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT