चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीसांनी गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल ५३ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन माजरी येथील सफौ रमेश तुराणकर व पोलीस अंमलदार उमेश उईके हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नागपूरकडून एक कंटेनरमध्ये जनावरांची अवैध तस्करी केली जात आहे. माहितीच्या आधारे माजरी पोलीसांनी तात्काळ वरोरा-वणी महामार्गावरील कुचना येथे नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित ट्रक कंटेनर क्रमांक DD03-R-9840 ला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता यू-टर्न घेत नागपूरच्या दिशेने पळ काढला. पोलीसांनी तत्काळ पाठलाग केला असता चालकाने कंटेनर रस्त्यावर उभा करून घटनास्थळावरून पलायन केले.
सदर वाहनाची तपासणी केली असता कंटेनरमध्ये ५३ नग गोवंशीय जनावरे — बैल, गायी व गोरे — अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने सर्व जनावरांची सुटका केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११(१)(ए), (ड), (ई), (एफ), (आय), (एल), महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ सुधारित २०१५ मधील कलम ५(अ), ९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८१, ४५, ३(५) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, २३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ७ लाख ९५ हजार रुपये किमतीची ५३ गोवंशीय जनावरे तसेच १५ लाख रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री अमित पांडेय यांच्या नेतृत्वात पोउपनि हरीदास चोपने, सफौ रमेश तुराणकर, पोअं ज्ञानेश कोटरंगे, रविंद्र किन्नाके, उमेश उईके व दिलीप मंडल यांनी पार पाडली.