गोवर्धन उपकालव्याची पाळ खचली; प्लास्टिकने झाकून लपवण्याचा प्रयत्न? 
चंद्रपूर

Chandarpur News | गोवर्धन उपकालव्याची पाळ खचली; प्लास्टिकने झाकून लपवण्याचा प्रयत्न?

कोट्यवधींच्या मजबुतीकरण कामावर प्रश्नचिन्ह; काम पूर्ण होताच उपकालव्याच्या पाळीला तडे, सिंचन विभागाच्या कारभारावर संताप

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावांतर्गंत येणाऱ्या गोवर्धन उपकालव्याच्या मजबुतीकरण कामातील कथित निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेले काम पूर्ण होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच उपकालव्याची पाळ खचल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, खचलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याऐवजी त्या ठिकाणी प्लास्टिक टाकून परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असून, यामुळे सिंचन विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावांतर्गत सावली सिंचन उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गोवर्धन उपकालव्याच्या मजबुतीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या कामामुळे कालव्याची पाळ अधिक मजबूत होईल आणि परिसरातील शेतकऱ्यांना अखंडित सिंचन सुविधा मिळेल, असा दावा करण्यात आला होता.

मात्र, काम पूर्ण होऊन काहीच दिवस उलटले असताना उपकालव्याची पाळ खचल्याचे समोर आल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत. इतक्या मोठ्या खर्चानंतरही कालव्याची पाळ टिकू न शकल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, खचलेल्या भागाची तांत्रिक दुरुस्ती करण्याऐवजी त्या ठिकाणी प्लास्टिक टाकून नुकसान झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष समस्येवर उपाय करण्याऐवजी ती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

या घटनेमुळे सिंचन विभागाच्या देखरेखीवर तसेच संबंधित कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम, देखरेखीतील त्रुटी आणि दोषींवर कारवाईचा अभाव यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, गोवर्धन उपकालव्याच्या पाळीच्या खचलेल्या भागाची तातडीने तांत्रिक तपासणी करून मजबुतीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT