चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत घोडाझरी उपकालव्यात तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सकाळी प्रथमच पाणी सोडण्यात आले. मात्र अवघ्या दहा तासांत तळोधी बा. जवळील ओवाळा गावानजीक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतात घुसले. रात्रभर पाण्याचा प्रवाह सुरू राहिल्याने परिसरातील शेतांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले असून धान रोवणी केलेली शेती आणि धानपरे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या असून कालव्याच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून सोमवारी सकाळी ७ वाजता घोडाझरी उपकालव्यात प्रथमच पाणी सोडण्यात आले होते. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यात पाणी आल्याने ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा आनंद काही तासांचाच ठरला.
सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास तळोदीजवळील ओवाळा गावाजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत मोठ्या वेगाने कालव्यातील पाणी लगतच्या शेतांमध्ये शिरले. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी रात्री साडेआठच्या सुमारास कालवा बंद केला. मात्र कालव्यात आधीच आलेले पाणी रात्रभर फुटलेल्या ठिकाणातून बाहेर पडत राहिल्याने परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
मंगळवारी सकाळपर्यंत ओवाळा परिसरातील अनेक शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली होती, तर अनेकांच्या शेतात रोवणीसाठी तयार ठेवलेले धानपरे होते. हे सर्व पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कालवा फुटला त्या ठिकाणी कालव्याच्या एका बाजूचे पाणी दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी कालव्याखालून सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. या पाईपमधून गळती सुरू झाल्यानंतर पाणी मातीच्या आत शिरू लागले. कालांतराने त्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आणि वाढत्या पाण्याच्या दाबामुळे कालव्याचा बांधच फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घोडाझरी उपकालवा हा ५५ किलोमीटर लांबीचा असून सध्या नागभीड तालुक्यातील जीवनापूरपर्यंत, म्हणजे सुमारे ४४ किलोमीटर अंतरापर्यंत पाणी सोडण्यात येत आहे. या कालव्यामुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सन २०१० मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे जवळपास दहा वर्षे रखडले होते. अखेर २०२५ मध्ये काम पूर्ण झाल्यानंतर यंदा प्रथमच कालव्यात पाणी सोडण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
मंगळवारी संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोकलेन मशीनच्या साहाय्याने एका बाजूला साचलेले पाणी दुसऱ्या बाजूला वळविण्याचे काम केले. मात्र दिवसभर कालव्याच्या भगदाडाची प्रत्यक्ष दुरुस्ती सुरू करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या घटनेत ओवाळा परिसरातील शेतकरी सुभाष मोहरले, पांडुरंग बनसोड आणि ज्ञानेश्वर मोहरले यांच्या धान रोवणी केलेल्या शेतांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे धानपरेही पाण्याखाली गेल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालव्याची दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.