चंद्रपूर : तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (दि. २० जुलै) सकाळी ७ वाजता गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी नागभिड आणि सिंदेवाही तालुक्यात जात असलेल्या घोडाझरी उपकालव्यात प्रथमच पाणी सोडण्यात आले. मात्र अवघ्या नऊ-दहा तासांतच तळोधी बा. जवळील ओवाळा गावानजीक कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात घुसले. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुमारे तीन तास पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू राहिल्याने धानपिक व पऱ्हयांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून कालव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यात आज सोमवारी सकाळी ७ वाजता विधिवत पूजा करून पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.
सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास तळोधी बा. परिसरातील ओवाळा गावाजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडून आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसले. साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत जवळपास तीन तास मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे धानपिकांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा नागभीड तालुक्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. अनेक ठिकाणी धानाची रोवणीही पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीत कालव्याला तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानुसार आज सोमवारी सकाळी पाणी सोडण्यात आले; मात्र त्याच दिवशी सायंकाळी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेमुळे घोडाझरी उपकालव्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सुमारे १५ वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम मागील वर्षी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पहिल्याच दिवशी कालवा फुटल्याने कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रात्री साडेआठच्या सुमारास कालव्यातील पाणी बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथून कालव्यात येत असलेले पाणी रात्रभर फुटलेल्या ठिकाणातून शेतांमध्ये वाहत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, कालवा दुरुस्त करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे या कालावधीत सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.