चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या घोडाझरी सिंचन तलावाच्या नहराला पुन्हा भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. तळोधी बाळापूर परिसरातील कात्यायनच्या बडबडा भागाजवळ नहर फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात व परिसरात वाहून जात असून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी धान पिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या काळात ही घटना घडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी घोडाझरी प्रकल्पातून नहरमार्गे पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पोहोचत असतानाच नवानगर परिसरालगत कालव्याला अचानक भगदाड पडले. परिणामी नहरमधील मोठ्या प्रमाणातील पाणी शेतात, रस्त्यांवर व परिसरातील अंबो बोडीत साचून वाहताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होत असून शेवटच्या टप्प्यातील अनेक शेतांपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे.
कात्यायनच्या बडबडा परिसरातील शेतकरी हे नहरच्या शेवटच्या टोकावर असल्याने त्यांना आधीच कमी दाबाने पाणी मिळत होते. आता कालवा फुटल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कडक उन्हाळ्यात पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता असताना सिंचन व्यवस्था कोलमडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उन्हाळी धान पिकाची लागवड सुरू असतानाच निर्माण झालेल्या या संकटामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारे पाणी अक्षरशः वाया जात आहे, मात्र सिंचन विभागाचे अधिकारी केवळ पाहत बसले आहेत,” अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, घोडाझरी तलावाच्या नहराला दरवर्षी ठिकठिकाणी भगदाड पडण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने सिंचन व्यवस्थेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ब्रिटिशकालीन या नहराचे आजपर्यंत संपूर्ण नूतनीकरण करण्यात आलेले नसून केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. परिणामी दरवर्षी ऐन पिकांच्या हंगामात पाण्याची नासाडी होऊन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. घोडाझरी तलावाच्या नहराच्या भक्कम दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करावा, जेणेकरून दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येतून शेतकऱ्यांची कायमची सुटका होईल, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
“डागडुजी नव्हे, कायमस्वरूपी नूतनीकरणाची गरज”
घोडाझरी तलावाच्या नहराला दरवर्षी ठिकठिकाणी भगदाड पडणे ही आता नित्याची बाब झाली आहे. सिंचन विभागाकडून फक्त फुटलेल्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र ती फार काळ टिकत नसल्याने पुन्हा पाण्याची गळती सुरू होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊन शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पादन घटते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवते. त्यामुळे ब्रिटिशकालीन घोडाझरी नहराचे संपूर्ण नूतनीकरण करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.