चंद्रपूर

Chandrapur News | जागतिक योग स्पर्धा २०२६ मध्ये डॉ. पूजा देऊरकर; सुवर्णपदकाची मानकरी

Dr Pooja Deurkar yoga gold medal | आज भद्रावती शहरात गौरव सोहळा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : भद्रावतीच्या कन्या डॉ. पूजा देऊरकर यांनी जागतिक योग स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावत देशासह भद्रावती शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या अभिमानास्पद यशाचा गौरव करण्यासाठी ११ जून रोजी शहरात भव्य विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक योग स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावून देशाचे आणि भद्रावती शहराचे नाव उंचावणाऱ्या सुवर्णकन्या डॉ. पूजा देऊरकर यांच्या सन्मानार्थ शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

ही विजय मिरवणूक ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता बाळासाहेब ठाकरे गेट येथून प्रारंभ होणार असून नाग मंदिर परिसरापर्यंत काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला संघटना, क्रीडाप्रेमी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

डॉ. पूजा देऊरकर यांनी योग क्षेत्रात सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि समर्पणाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भद्रावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या ऐतिहासिक आणि गौरवास्पद क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ, भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे. भद्रावती शहराच्या इतिहासात अभिमानाने नोंद होईल असा हा गौरव सोहळा ठरणार असून, सुवर्णकन्येच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT