Chandrapur GST Bhavan 
चंद्रपूर

Chandrapur GST Bhavan | चंद्रपूरच्या करसामर्थ्याला नवे बळ; ३० कोटींच्या जीएसटी भवनाचे लोकार्पण

चंद्रपूर विभागाची महसूल संकलनात राज्यात द्वितीय कामगिरी; १,४५० कोटींचा जीएसटी महसूल

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

लोकार्पण सोहळ्यास वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर राज्यकर आयुक्त विजय डांगे, राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी प्रणाली लागू करून करव्यवस्थेत मोठी सुधारणा घडवून आणली. या एकात्मिक करप्रणालीमुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असून राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी प्रास्ताविकात सांगितले की, चार मजली या नव्या इमारतीसाठी २९ कोटी ९९ लाख ८० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. चंद्रपूर विभागाचे मुख्यालय म्हणून या इमारतीतून चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचे कामकाज पाहिले जाणार आहे.

चंद्रपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे १,४५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा केला आहे. महसूल संकलनातील लक्ष्यपूर्तीत १२२ टक्के कामगिरी नोंदवत विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून नव्या इमारतीची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

देशाच्या विकासात चंद्रपूरचा सिंहाचा वाटा : ॲड. आशिष जयस्वाल

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, उद्योग, खनिजसंपदा आणि वनसंपदेने समृद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा राज्याच्या महसूल वाढीत मोलाचे योगदान देत आहे. देश आणि महाराष्ट्राच्या विकासात या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे.

‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. नव्या जीएसटी भवनामुळे कर प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन् पालकमंत्र्यांनी मागीतली माफी

आजच्या कार्यक्रमात डॉ. जयस्वाल आणि पालकमंत्री उईके यांनाच बोलण्याची संधी मिळाली. उपस्थित लोकप्रतिनीधींना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावर बोलतांना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले की, ’एखाद्या कार्यक्रमाला उशीर होत असेल, तर कार्यक्रम वेळेत सुरू करावा आणि उशिरा येणाऱ्या पाहुण्यांनी त्यांच्या सोयीनुसार यावे, अशी माझी भूमिका राहिली आहे. मात्र आजच्या कार्यक्रमात आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळाली नाही, याची खंत वाटते. लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांनाही आपले मत मांडण्याची संधी मिळायला हवी. आजच्या कार्यक्रमात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी सर्वांना न्याय देण्याची आणि सर्वांचा सन्मान राखण्याची आहे. त्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची मी क्षमा मागतो.’ असे बोलून त्यांनी उपस्थित लोकप्रतिनीधींची माफी मागीतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT