चंद्रपूर

Chandrapur News : 'फोटो काढायला जाते' सांगून निघालेली १० वीची विद्यार्थिनी बेपत्ता; फूस लावून पळवल्याचा संशय

बसस्थानकावर मैत्रिणींसोबत दिसली, त्यानंतर फोन बंद; आई-वडिलांचा अपहरणाचा संशय

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : फोटो काढण्यासाठी वरोऱ्याला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी गूढरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला असून, याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वरोरा येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तिने शाळेत न जाता फोटो काढण्यासाठी वरोऱ्याला जात असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर तिचे आई-वडील शेतमजुरीसाठी निघून गेले. सायंकाळी सुमारे पाच वाजता आई-वडील घरी परतले असता मुलगी घरी नव्हती.

कुटुंबीयांनी मोठ्या मुलाकडे विचारणा केली असता, ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकावर शाळेतील मैत्रिणींसोबत दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आढळला. नातेवाईक, परिचित आणि गावात शोध घेऊनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

अखेर मुलीच्या आईने वरोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून घेत मुलीचा शोध सुरू केला असून, ती नेमकी कुठे गेली आणि तिच्यासोबत काय घडले, याचा कसून तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT