ब्रह्मपुरी (चंद्रपूर): ज्या वयात पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन आनंदाने शाळेत जायचे, त्याच वयात एका चिमुरड्यावर काळाने झडप घातली. शाळेत जाण्यासाठी गणवेश परिधान करून तयार होत असतानाच, अवघ्या १० वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, निसर्गाच्या या क्रूर खेळाने सर्वजण अवाक झाले आहेत.
ईशान सत्यपाल आत्राम असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. तो ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे लवकर उठला. शाळेत जाण्याचा उत्साह होता, चेहऱ्यावर हास्य होते. त्याने आपली आंघोळ आटोपली आणि तो शाळेचा गणवेश अंगात चढवत होता. मात्र, सकाळी ७ वाजेच्या सुमारास नियतीला काही वेगळेच मान्य होते. गणवेश परिधान करत असतानाच ईशानला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जागीच कोसळला.
आपल्या पोटच्या गोळ्याला अचानक जमिनीवर कोसळताना पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ईशानला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र ईशानचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले नाही. काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर हेलावून गेला होता.
अवघ्या १० वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा असा तीव्र झटका कसा येऊ शकतो, या प्रश्नाने वैद्यकीय विश्वासह सर्वसामान्यांनाही सुन्न केले आहे. ज्या हातांनी आज शाळेत पाटी-पेन्सिल धरायला हवी होती, त्या हातांची हालचाल कायमची थांबली. एका उमलत्या कळीचा असा अंत झाल्याने देलनवाडी गावासह त्याच्या शाळेतील शिक्षक आणि मित्रपरिवारामध्ये प्रचंड शोक व्यक्त केला जात आहे.