Man Animal Conflict Chandrapur
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथुर आणि बाळापुर परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई करत सावर्ला (तळोधी जवळ) येथे एका नर वाघाला यशस्वीरित्या जेरबंद केले.
नागभीड तालुक्यातील मिंथुर, बाळापुर आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता.
या पार्श्वभूमीवर तळोधी जवळील सावर्ला परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचत एका नर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले. प्रशिक्षित शुटर्सच्या मदतीने ही कारवाई पार पडली. वाघाला सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला ट्रॅक्टरवरून नागभीड येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.
यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वाघाला पिंजऱ्यासह मोठ्या मेटॅडोरमध्ये ठेवून नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, परिसरात अजूनही चार वाघांचा वावर असल्याची माहिती असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे व गस्त वाढविण्यात आली आहे.