Nagbhid APMC Godown Fire Pudhari
चंद्रपूर

Nagbhid APMC Fire | नागभीड बाजार समितीच्या धानाच्या गोडाऊनला भीषण आग; तीन कोटींचे नुकसान

आगीत ६ हजार २८० पोती धान, २१६ बंडल बारदान खाक; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

Nagbhid APMC Godown Fire

चंद्रपूर : नागभीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन क्रमांक १ ला मंगळवार (दि.२४) पहाटे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले हजारो पोती धान, बारदाना तसेच गोडाऊनची इमारत जळून खाक झाली. या दुर्घटनेत अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बाजार समितीच्या गोडाऊन क्रमांक १ मधून धूर आणि आगीचे लोट दिसून आले. गोडाऊनला आग लागल्याचे बाजार समितीच्या चौकीदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधितांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नागभीड आणि ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. दोन्ही अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोडाऊनमधील धान आणि बारदान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. जळालेल्या गोडाऊनमध्ये धानाची ६ हजार २८० पोती तसेच बारदान्याचे २१६ बंडल साठवून ठेवण्यात आले होते. या आगीत धान, बारदाना आणि गोडाऊनच्या इमारतीचे मिळून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेष म्हणजे गोडाऊन मध्ये साठवलेले धान हे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली होती. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बाजार समितीच्या गोडाऊनला लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आगीच्या कारणांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT