चंद्रपूर

Chandrapur Murder | पत्नीच्या विरहातून पित्याचे क्रौर्य; ८ वर्षीय मुलाची हत्या! दोन मुलांवर केला ब्लेडने हल्ला

; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; दुर्गापूर पोलिसांकडून आरोपी पिता अटकेत

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : पत्नीपासून विभक्त राहण्याच्या कारणातून तसेच सततच्या कौटुंबिक वादाच्या रागातून एका पित्याने आपल्या दोन मुलांवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना दुर्गापूर येथील शक्तीनगर वेकोलि वसाहतीत रविवारी (१० ऑगस्ट) घडली. या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, तर १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी पित्याला दुर्गापूर पोलिसांनी तुकूम तलाव परिसरातून अटक केली आहे.

शक्तीनगर वेकोलि वसाहतीतील एम-२९ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या मंगेश भारत बदखल (४९) याने आपल्या मुलांवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात देवांश मंगेश बदखल (८) याचा मृत्यू झाला, तर रुद्रांश मंगेश बदखल (१२) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पत्नीपासून वर्षभरापासून विभक्त

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगेश बदखल हा ऑटो चालवून मुलांचा सांभाळ करीत होता. कौटुंबिक वाद आणि सततच्या भांडणांमुळे त्याची पत्नी वर्षभरापासून त्याच्यापासून विभक्त राहत होती. दरम्यान, मुलांना आपल्यासोबत घेऊन जाण्याच्या मुद्द्यावरून मंगेश आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवरून वाद होत असल्याचे समोर आले आहे. मंगेश हा त्याचा भाऊ राहुल बदखल याच्यासोबत शक्तीनगर येथील क्वार्टरमध्ये राहत होता. राहुल वेकोलिमध्ये कार्यरत असून, त्याची पत्नीही माहेरी गेल्याने घरात दोन भाऊ आणि दोन मुले राहत होती.

रागाच्या भरात मुलांवर ब्लेडने वार

१० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता मंगेश घरी आला. यावेळी मुलांना घेऊन जाण्याच्या मुद्द्यावरून पत्नीशी झालेल्या वादाचा राग मनात धरून त्याने दोन्ही मुलांवर ब्लेडने हल्ला केल्याची माहिती आहे. त्याने मुलांच्या गळ्यावर वार केल्याने दोन्ही मुले रक्तबंबाळ झाली.

हल्ल्यात देवांश याचा जागीच मृत्यू झाला, तर रुद्रांश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी देवांशला मृत घोषित केले. रुद्रांशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

हत्येनंतर आरोपी फरार; तलाव परिसरातून अटक

मुलावर हल्ला केल्यानंतर मंगेशने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी त्याला तुकूम तलाव परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, आरोपी मंगेश बदखल याच्यावर २०२४ मध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमागील नेमकी कारणे आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत. या घटनेतील आरोपी मंगेश भारत बदखल याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT