आरोपी शामराव केशव बावणे, मृत कुकसु केशव बावणे व जखमी योगिता बावणे 
चंद्रपूर

Chandrapur Murder | जागेच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची कुऱ्हाडीने हत्या!

सावली तालुक्यातील डोंगरगाव (मस्के) येथील घटना; पत्नी गंभीर जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : घराच्या जागेच्या जुन्या वादाने अखेर रक्तरंजित वळण घेत सावली तालुक्यातील डोंगरगाव (मस्के) येथे मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुकसू केशव बावणे (वय ५०) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी योगिता कुकसू बावणे (वय ४५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाथरी पोलिसांनी आरोपी मोठा भाऊ शामराव केशव बावणे (वय ५३) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (मस्के) येथील बावणे कुटुंबात घराच्या जागेच्या मालकीवरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात आरोपी शामराव बावणे याने हातातील कुऱ्हाडीने लहान भाऊ कुकसू बावणे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.

या हल्ल्यात कुकसू बावणे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. पतीला वाचविण्यासाठी धावून आलेल्या योगिता बावणे यांच्यावरही आरोपीने कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

जखमी कुकसू बावणे व योगिता बावणे यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे कुकसू बावणे यांची प्राणज्योत मालवली. योगिता बावणे यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

योगिता कुकसू बावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलिसांनी आरोपी शामराव केशव बावणे याच्याविरुद्ध अप. क्र. ११७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे तसेच खलेश कोरे, अमित मस्के आणि बळीराम बारेकर हे करीत आहेत. घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावानेच लहान भावाचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे डोंगरगाव (मस्के) परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT