चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापनेच्या दिशेने निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक संख्याबळ सहज जुळवता येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत असून, सोमवारी अधिकृतपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेची गणिते वेगाने बदलत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 34 जागांपासून काँग्रेस अजून चार जागा दूर आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस ही उणीव भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली करत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले आणि अपक्ष म्हणून विजयी झालेले दोन बंडखोर नगरसेवक तसेच बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी एक नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
या सर्व समीकरणांमुळे काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठीचे आवश्यक संख्याबळ सहज गाठता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष हालचालींना सुरुवात केली असून, पाठिंब्याबाबत चर्चा आणि समन्वय सुरू असल्याची माहिती आहे. सर्व घडामोडी लक्षात घेता, चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा कौल काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत असून, सोमवारी अधिकृतरीत्या सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.