चंद्रपूर

Chandrapur District Municipal Council Election 2025: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा झंझावात; ११ पैकी ७ नगरपरिषद–नगरपंचायतींवर सत्ता

भाजपला केवळ दोन ठिकाणी यश, शिंदे गट व अपक्षांनाही प्रतिनिधित्व

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: जिल्ह्यात रविवारी (दि. २१ डिसेंबर) पार पडलेल्या १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीच्या मतमोजणीत काँग्रेसने भाजपला जोरदार धोबीपछाड देत जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण ११ पैकी तब्बल ७ ठिकाणी काँग्रेसने सत्ता मिळवली, तर भाजपला फक्त २ ठिकाणीच समाधान मानावे लागले.

एका नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट) तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने नगराध्यक्षपदाची बाजी मारली आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत जाणकारांनी दिले आहे.

नागभीड : काँग्रेसचा धक्का, भाजप पिछाडीवर

नागभीड नगरपरिषदेत काँग्रेसने १३ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. भाजपचे ६ तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. काँग्रेसच्या सौ. स्मिता प्रफुल खापर्डे नगराध्यक्षपदी निवडून आल्याने भाजपला येथे मोठा धक्का बसला आहे.

ब्रह्मपुरी : काँग्रेसचा एकतर्फी विजय

२३ सदस्यीय ब्रह्मपुरी नगरपरिषदेत काँग्रेसने तब्बल २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. भाजपला 1 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला 1 जागा मिळाली. काँग्रेसचे योगेश मिसार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

राजुरा : १७ जागांसह काँग्रेसची सत्ता

राजुरा नगरपरिषदेत काँग्रेसने १७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळवली. भाजपला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला. काँग्रेसचे अरुण धोटे नगराध्यक्ष झाले. ही निवडणूक काँग्रेस–शेतकरी संघटना–रिपाई–महाविकास आघाडीच्या वतीने लढविण्यात आली होती.

मूल : काँग्रेसचा दणदणीत विजय

मूल नगरपरिषदेत काँग्रेसने २१ पैकी १८ जागा जिंकत भाजपचा सपशेल पराभव केला. भाजपला फक्त २ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या एकता समर्थ नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

बल्लारपूर : मुनगंटीवारांच्या गडाला तडा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बल्लारपूर नगरपरिषदेत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. काँग्रेसचे १७ उमेदवार विजयी झाले. भाजप ७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, शिवसेना (उद्धव) ५, शिवसेना (शिंदे) १ उमेदवार विजयी झाला. काँग्रेसच्या सौ. अल्का वाढई नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

वरोरा : संमिश्र निकालात काँग्रेसचा नगराध्यक्ष

वरोरा नगरपरिषदेत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे नगराध्यक्षपदी निवडून आल्या. येथे भाजप १२, काँग्रेस १०, शिंदे गट २, उद्धव गट १, राष्ट्रवादी (अजित पवार) १ व 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला.

घुग्घुस : काँग्रेसची सत्ता कायम

घुग्घुस नगरपरिषदेत काँग्रेसच्या दीप्ती सोनटक्के नगराध्यक्षपदी निवडून आल्या. येथे काँग्रेस ११, भाजप ७, राष्ट्रवादी (अजित पवार) २ व २ अपक्ष उमेदवार विजयी झाले.

चिमूर : भाजपचा गड कायम

आमदार कीर्तीकुमार बांगडिया यांचा गड असलेल्या चिमूर नगरपरिषदेत भाजपने सत्ता राखली. २१ पैकी भाजप १४, काँग्रेस ४ व २ अपक्ष उमेदवार विजयी झाले. भाजपच्या गीता बाबा लिंगायत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

भिसी नगरपंचायत : भाजपचा विजय

भिसी नगरपंचायतीत भाजपचे अतुल पारवे नगराध्यक्ष झाले. येथे भाजप ८, काँग्रेस ७ व २ अपक्ष उमेदवार विजयी झाले.

भद्रावती : शिंदे गटाची सत्ता

भद्रावती नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)ने सत्ता मिळवली. शिंदे गट १२, काँग्रेस ६, भाजप २, बसपा १, वंचित १ व १ अपक्ष उमेदवार विजयी झाला. प्रफुल्ल चटकी नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले.

गडचांदूर : अपक्षाचा अपवाद

गडचांदूर नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार निलेश ताजने नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. येथे भाजप ८, काँग्रेस ६, ताजने गट ५ व शिवसेना (उद्धव) १ उमेदवार विजयी झाला. एकूण ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेस, २ ठिकाणी भाजप, १ ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि १ ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT