Chandrapur Local Body Elections
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून अधिकृत प्रारंभ झाला आहे. मात्र, तिन्ही दिवस एकही एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. आज (दि.१३) चौथ्या दिवशी सदस्य पदाकरता २ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेला औपचारिक प्रारंभ झाला आहे. मात्र, अध्यक्ष पदाकरीता अजूनही एकही नामनिर्देन पत्र दाखल करण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच 10, 11 आणि 12 नोव्हेंबररोजी कोणतेही अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र, आज (दि.13) घुग्घुस व चिमुर नगरपंचायतीत प्रत्येकी एक उमेदवाराने अर्ज दाखल केला. त्यामुळे एकूण दोन अर्जांची नोंद झाली आहे. इतर सर्व नगरपंचायतींमध्ये अर्ज दाखल झालेले नाहीत.
नामनिर्देशनाच्या पहिल्या काही दिवसांमध्ये उमेदवारांनी निरीक्षण घेत शांतता पाळली होती. मात्र आता जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु झाली असून आगामी काही दिवसांत अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार असून, त्यानंतर छाननी, मागे घेण्याची मुदत आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांमध्येही चुरस अपेक्षित आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. पहिल्या टप्प्यात कमी अर्ज आले असले तरी पुढील काही दिवसांत सर्वच नगरपंचायतींमध्ये उमेदवारांची लगबग वाढेल अशी अपेक्षा आहे.