चंद्रपूर

Chandrapur Municipal Corporation : ईश्वरचिठ्ठीने ठरला चंद्रपूर मनपाचा स्थायी सभापती; मनस्वी गिऱ्हे विजयी

८–८ मतांची बरोबरी; नाट्यमय घडामोडींनंतर चिठ्ठीद्वारे निर्णय

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील स्थायी सभापती पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप–शिवसेना (ठाकरे) युतीचे उमेदवार मनस्वी गिऱ्हे आणि काँग्रेसचे उमेदवार वसंत देशमुख यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र दोन्ही बाजूंना समान ८–८ मते मिळाल्याने अखेर ईश्वरचिठ्ठीद्वारे निकाल लावण्याची वेळ आली. या प्रक्रियेत मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची स्थायी सभापतीपदी निवड झाली.

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. भाजप–शिवसेना (ठाकरे) युतीकडून मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानाच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय मोर्चेबांधणी केली होती. परिणामी मतदानानंतर दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली आणि निकाल अनिश्चित झाला.

नियमांनुसार मतांची बरोबरी झाल्यास ईश्वरचिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याची तरतूद असल्याने अखेर त्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या प्रक्रियेत मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आणि त्यांची चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली.

या निकालानंतर भाजप–शिवसेना (ठाकरे) युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर काँग्रेसला अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. स्थायी समिती ही महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाची समिती मानली जात असल्याने या निवडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT